नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी शनिवारी मंदिर ट्रस्टच्या बैठकीनंतर दोन तारखा निवडण्यात आल्या होत्या अशी माहिती दिली. शनिवारी सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंपत राय यांच्याशिवाय अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी, कामेश्वर चौपाल, नृत्यगोपाल दास, गोविंद देव गिरी महाराज आणि दिनेंद्र दास यांच्यासहीत इतरही ट्रस्टी उपस्थित होते.