नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जून रोजी कोचीतील मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. या मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातील पाहूण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील निमंत्रित पाहूणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिस्टमध्ये मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना निमंत्रितच करण्यात आले नव्हते. मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना निमंत्रित न केल्यामुळे केंद्र सरकारवर अनेकांनी टीकाही केली आहे. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांचे नाव नसल्याने केरळमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर अखेर पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत ई. श्रीधरन यांना निमंत्रण दिले आहे.
केरळ सरकारचे पत्र
ई. श्रीधरन यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने केरळ सरकारने बुधवारी पंतप्रधान कार्यालयालाही पत्र लिहिलं होतं. ई. श्रीधरन यांच्या नावाचा समावेश मेट्रो उद्घाटनासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा असे या पत्रात म्हटलं होतं. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन वाद निर्माण करण्याचे काहीच कारण नाही. निमंत्रण न दिल्याने मी नाराज झालेलो नाहीये आणि पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची आहे असे वक्तव्य यापूर्वी ई. श्रीधरन यांनी केलं होतं.
प्रमुख सल्लागार होते
ई. श्रीधरन दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रमुख सल्लागार होते. ई. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली मेट्रो केवळ चार वर्षांमध्ये पूर्ण झाली. दिल्ली मेट्रोचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पूर्ण होण्यात श्रीधरन यांची मोहत्वाची कामगिरी होती आणि म्हणूनच त्यांना मेट्रो मॅन असे संबोधले जाते.