अखेर मोठे कडवान ग्रामस्थांना मिळाले रेशनचे धान्य

0
  1. नवापूर: तालुक्यातील मोठे कडवान येथे स्वस्त धान्य दुकानात एप्रिल महिन्याचे नियमित व प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना अंतर्गत मिळणारे धान्य अल्प पुरवठा करण्यात आल्याने काही लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले होते. याबाबत सरपंच व ग्राम दक्षता समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर तालुका प्रशासनाने दखल घेत सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात आले. यासंदर्भात दैनिक ‘जनशक्ति’ ने गुरुवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

नवापूर तालुक्यातील मोठे कडवान गावातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून एप्रिल महिन्याचे धान्य गावातील 485 पैकी 147 कार्डधारकांना वाटप केले. उर्वरित 238 कार्डधारकांना नियमित धान्य मिळाले नव्हते. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे रेशन दुकानदाराविषयी नाराजी व्यक्त करत चौकशी करून योग्य कारवाई करून नियमित धान्य वाटप करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती.

या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी कार्डधारकांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तालुका प्रशासनाला यासंबंधी चौकशी करून उर्वरित धान्य पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. स्वस्त धान्य दुकानदाराकडून वार्षिक सरासरी दर महिन्याला उचलत असलेल्या धान्याच्या साठा वितरण करत असल्याप्रमाणे एप्रिल महिन्यात उचलला. परंतु लॉकडाऊमुळे गावातील ग्रामस्थ हे कामधंद्यानिमित्त गुजरात राज्यात असल्याने ग्रामस्थांची संख्याही कमी असल्यामुळे तेवढीच उचल केली होती. परंतु संपूर्ण संचारबंदी परिस्थिती असल्यामुळे गावकरी काम धंदे ठप्प झाल्यामुळे त्यांच्यापुढे रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला होता. कामधंदेअभावी त्यांची उपासमार होऊ नये म्हणून पुन्हा आपल्या गावी परतल्याने रेशनकार्ड धारकांची संख्या वाढल्याने उर्वरित लाभार्थ्यांना या महिन्याची चलन कमी भरल्यामुळे धान्यसाठा कमी पुरविण्यात आला होता. त्यामुळे ग्राम दक्षता समितीने धान्याची मागणी केली असता जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेतल्याने पुरवठा विभागाकडून पुन्हा चलन भरण्याच्या सूचना देण्यात आल्यार. स्वस्त धान्य दुकानदाराने पुन्हा चलन भरून उर्वरित धान्याची मागणी सरपंच बंधू पाच्या वळवी व रेशन दुकानदार आर.एम.वळवी यांनी पुरवठा विभागात केल्यावरही धान्य मिळण्यास विलंब होत होता. या दरम्यान प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1407 लाभार्थी असून त्यांना 7 हजार 35 किलो धान्य पुरविणे अपेक्षित असताना पुरवठा विभागाकडून फक्त 5 हजार 600 किलो धान्य पुरविले गेले.
तसेच उर्वरित 1425 किलो धान्य पुरवठा करण्यास विलंब होत असल्याने लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यासाठी आलेले मंडळ अधिकारी बी.एन सोनवणे यांच्या वाहनाला ग्रामस्थांनी रस्त्यात घेराव घातला. ग्रामस्थांना धान्य मिळाले नसल्याने संबंधित विभागाने धान्याचे मागणी करून पुर्ण धान्य पुरवठा होत नाहीत. तोपर्यंत गावात एकही शासकीय वाहनांना प्रवेश देणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांना परत पाठविले. त्यानंतर पुरवठा विभागाकडून उर्वरित धान्य पुरविण्यात आल्याने सर्व लाभार्थ्यांना सूचना देऊन धान्य आल्याने उर्वरित नियमित धान्यासह प्रधानमंत्री कल्याण योजना अंतर्गत मिळणारे धान्य दिले जात आहे.
नवापूर तालुक्यातील मोठे कडवान गावात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा अधिकार्‍यांनी उर्वरित धान्य पुरवठा सुरळीत करून दिल्यानंतर गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ग्रामपंचायतीच्या सभा मंडपात सुसज्ज बैठक व्यवस्था करून ग्रामस्थांना स्वस्त धान्य वाटप केले जात असल्याचे सरपंच बंधु गावित यांनी सांगितले.