मुंबई । मागील खेपेस उपविजेत्या ठरलेल्या उत्तरप्रदेशच्या यतिंदर सिंगने आपले मागील अपयश पुसून टाकताना महाराष्ट्राच्या एकाहून एक अशा सरस शरीरसौष्ठवपटूंना मागे टाकत तिसर्या तळवळकर्स क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या किताबावर नाव कोरले. देशातील आघाडीच्या शरीरसौष्ठवपटूंना मात देत स्पर्धा जिंकणार्या यतिंदर सिंगला स्पर्धेचे मुख्य संयोजक मधुकर तळवळकर आणि त्यांच्या पत्निच्या हस्ते सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मिश्र दुहेरीतही उत्तर प्रदेशच्याच संजना दलाक आणि बिलाल राव या जोडीने बाजी मारली आणि उत्तर प्रदेशने दुहेरी जेतेपदाचा मान पटकावला. प्रथमच झालेल्या सिंक्रोनाइज जोडीच्या प्रकारात सोनिया मित्रा आणि सनी रॉय या बंगाली जोडीने यश मिळवले. देशातील अव्वल तीस शरीरसौष्ठवपटू दर दोन वर्षांनी होणार्या तळवळकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी झाले होते. सोमवारी झालेल्या प्राथमिक फेरीमधून दहा जणांची मुख्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या दहा जणांमध्ये सात जण महाराष्ट्राचे असल्यामुळे यजमानांचा शरीरसौष्ठव बाजी मारेल असा अंदाज होता. पण मागील अपयशामुळे तावून सुलाखुन निघालेला यतिंदर जय्यत तयारीनिशी स्पर्धेसाठी आला होता. महाराष्ट्राचा सुनित जाधवही विजेतेपदाच्या शर्यतीत होता. पण पंचानी आपल्या निर्णयाचा कौल यतिंदरच्या बाजूने दिला. यतिंदर लगेचच मुंबापुरीतल्या जाणत्या क्रीडा प्रेमींसमोर नतमस्तकही झाला.