अखेर ‘या’ दिवशी राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते पाटील करणार भाजपात प्रवेश !

0

मुंबई:लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असतांना कॉंग्रेसला मोठा झटका बसणार आहे. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत माध्यमातून वृत्त देखील आले आहे. दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली असून १२ एप्रिलला अहमदनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे, या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.

तसेच विजय सिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. १७ एप्रिलला अकलुज येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत असे वृत्त आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हे दोन्ही आपआपल्या जिल्ह्यातील दिग्गज नेते असून त्यांचा पक्षबदल काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही आमदारही भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे. अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा न सुटल्यामुळे त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे.