मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील राज्यभरातील हॉटेल्स, लॉजिंग बंद करण्यात आले होते. मिशन बिगीन अगेनच्या दोन टप्प्यांमध्ये सारेच व्यवसाय सुरु झाले होते. मात्र, हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आता राज्यभरातील हॉटेल्स, लॉजिंग येत्या 8 जुलैपासून सुरु होणार आहेत. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल रविवारी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यानंतर आज सोमवारी याचे आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांसाठी तसेच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली आहे. याठिकाणच्या कन्टेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेलना ही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकणार आहेत.
तसेच उर्वरित राज्यासाठीदेखील 33 टक्के क्षमतेची अट घालण्यात आली आहे. हे हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे. तसेच 33 टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली 67 टक्के क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे अधिकार हे सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.