अखेर राज्यातील दुष्काळी तालुक्यात अमळनेर व तालुक्याचा समावेश

0

जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – आमदारांची अपेक्षा
आ.शिरीष चौधरी यांचे प्रयत्न सफल; मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे मानले आभार
अमळनेर – राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत केली. यात अमळनेर तालुक्यासह मतदारसंघातील पारोळा तालुक्याचाही समावेश झाल्याने आ. शिरीष चौधरी यांचे प्रयत्न सफल ठरले असून मुख्यमंत्री व राज्याचे महसूल मंत्री ना चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने व्यक्त केले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता आदेशाप्रमाणे तात्काळ उपाययोजना राबवून शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

अमळनेर तालुक्यातील 154 व पारोळ्यातील 44 गावांचा समावेश
यासंदर्भात आ.चौधरी यांनी प्रशासनाकडे वेळीवेळी पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तालुक्यासह मतदार संघातील गावांची वर्तमान स्थिती लक्षात आणून दिली, एवढेच नव्हे तर या महिन्यात महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अमळनेर व पारोळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुक्याची दखल घेणे प्रशासनास भाग पडून राज्यातील दुष्काळी तालुक्यात अमळनेर तालुक्याचाही समावेश झाला आहे. अमळनेर तालुक्यातील 154 व पारोळा तालुक्यातील 44 गावांना शासनाकडून लाभ मिळणार आहेत.

राज्यात 180 तालुके दुष्काळग्रस्त
दरम्यान राज्यातील 180 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे व त्या अनुषंगाने संबधित संबधित पीडित गावांना जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनरगठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शितीलथा, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी व्यवस्था टंचाई घोषित केलेल्या गांवात शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी सवलती मिळणार असल्याचे आ चौधरी यांनी सांगितले. प्रशासनाने सदर योजनांचा नियोजन करावे, अशी अपेक्षाही असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले.