BREAKING: अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस !

0

मुंबई:राज्यात सत्ता संघर्षात कोणत्याही पक्षाला सरकार बनविता न आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. कारण राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राजवटीची शिफारस केली आहे. तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. एका पत्राद्वारे राष्ट्रवादीने राज्यपालांना निर्णय कळविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा अहवाल गृहमंत्रालयाला दिल्याची चर्चा आज दिवसभर सुरु होती. आज संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेबाबत कोणतीही तयारी झाल्याचे दिसून येत नसल्याने अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.

राज्यपालांनी सुरुवातीला मोठा पक्ष म्हणून भाजपला त्यानंतर शिवसेना आणि आता तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. परंतु अद्यापही सरकार स्थापन होईल असे दिसून येत नसल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शिफारस केली आहे.