अमळनेर । येथील पं.स.च्या उपसभापती यांनी तालुक्यातील निर्माण झालेल्या पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी 8 दिवसात जर निधी उपलब्ध झाला नाही तर पदाचा राजीनामा देणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानुसार मागील वर्षाच्या विहीर अधिग्रहणाचा थकीत सुमारे 15 लाख रुपये निधी प्राप्त झाल्याचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांनी सांगितले. तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत असताना मात्र टंचाई काळात विहीर अधिग्रहण केल्याचा मोबदला म्हणून मागील वर्षाचे व चालू वर्षाचे पैसे विहीर मालकांना मिळाले नाहीत म्हणून मालकांनी नाराजी व्यक्त केली होती. पं.स.कडून पैसे नसल्याचे कारण देण्यात येत असल्याने उपसभापती व सदस्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही, म्हणून उपसभापती त्रिवेणीबाई शिवाजी पाटील यानी निधी न मिळाल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
जनशक्तीच्या वृत्ताची दाखल घेत गेल्या वर्षाची 52 विहिरीच्या अधिग्रहनाचा मोबदला म्हणून थकबाकी असलेले सुमारे 3 लाख 80 हजार रुपये आणि चालू वर्षाच्या 43 विहिरीचे अधिग्रहणचा सप्टेंबरपर्यंतचा मोबदला सुमारे 12 लाख रुपये असा एकूण 15 लाख रुपयांचा निधी पंचायत समितीला प्राप्त झाला असून टंचाईवर मात करणे सोयीस्कर होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांनी जनशक्तिशी बोलतांना दिली.
दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढत चालली असून टँकर सुरू असलेल्या गावांची संख्या 21 वरून 26 झाली आहे. नव्याने नगाव बुदुक, धुपी, खेडी, खर्दे, वासरे या गावाना टँकर सुरू झाले आहेत. नगावसाठी सरपंच प्रेरणा बोरसे व सुशील बोरसे यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता तसेच दरेंगाव, टाकरखेडा, तरवाडे या गावांचे टँकर प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत, असेही पटाईत यांनी सांगितले दरम्यान टंचाईची तीव्रता वाढल्यास सावखेडा, धावडे, भिलाली या ठिकाणाहून टँकर भरण्याची व्यवस्थ करण्यात येणार आहे सध्या अमळनेर येथून बंगालच्या विहिरीवरून टँकर भरण्यात येत आहेत. त्याहीपेक्षा अधिक टंचाई भासल्यास अमळनेर नगरपरिषदेकडून व खाजगी विहिरीवरून टँकर भरून घेतले जातील, असे सांगण्यात आले.