जळगाव – लॉकडाऊन आहे, तरीही लोक ऐकत नाहीत. कोरोनाची भीती आहे तरीही गर्दीचे नियोजन होत नाही. जिल्ह्याच्या सीमा सील आहेत तरीही बाहेरगावहून जिल्ह्यात येणारे थांबत नाहीत मग साहेबाचे प्रशासन नेमके करतेय तरी काय? असा संतप्त सूर जनतेमध्ये आहे. आता तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर चुकांचे पितळ उघडे पडले आहे.
जनशक्ति ऑनलाईनने ‘बेफिकीर जळगावकरांचे करायचे काय, पोलिसांनाही पडला प्रश्न?’ आणि ‘कोरोनासाठी जळगाव पोषक, शेकडो बाधित होण्याचा धोका’ या दोन बातम्यांमधून शहरातील अनागोंदी समोर आणली. त्यावर जनतेने अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही बाहेरून अनेकजण जळगावमध्ये कसे येत आहेत, असा प्रश्न सजग जळगावकरांनी उपस्थित केला आहे.
वाचक काय म्हणाले,
विरेंद्र पाटील – गावात विनाकारण हिंडणाऱ्यांना अटकाव झाला पाहिजे. पोलीस आणि प्रशासन दरवेळी काय करेल? त्यापेक्षा स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कृउबामधील सकाळची परिस्थिती पाहून अंगावर खरेच काटा येतो. जनतेची कीव येते, असेही त्यांनी म्हटले आहे. आशिष मलबारी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राजू खेडकर यांनी अनागोंदीवर बोट ठेवले आहे. प्रशासन म्हणते, रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने खुली राहतील. त्यामुळे दिवसभर लोक रस्त्यावर फिरत असतात. त्याऐवजी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी 2 तास दुकान उघडण्यास परवानगी द्यावी. याशिवाय इतर वेळी कोणीही रस्त्यावर फिरू शकणार नाही, असे आदेश प्रशासनाने काढावेत, अशी सूचना केली आहे. शहरातील पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल मिळणार नाही, असे सांगितले जात असेल तर या सेवांव्यतिरिक्तची अनेक वाहने रस्त्यावर कशी धावत आहेत, त्यांना कुठून पेट्रोल मिळते. नवी पेठेत फळ विक्रेते एकाच ठिकाणी थांबून असतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होते. शिवाय हे विक्रेते तोंडावर मास्कही लावत नाहीत. त्यांना नियम नसतील तर मोठ्या दुकानदारांना जाचक नियम कशासाठी लावण्यात आले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. समिधा सोवनी यांनी लोकांमध्ये गंभीरपणाच नाही. त्यामुळे हातात माईक घेऊन गल्लोगल्ली जनजागृती करावीशी वाटते, अशी इच्छा व्यक्त केली आहे.