अखेर शेतकर्‍यांचा विजय!

0

मुंबई : आजपासून महाराष्ट्रातील सर्व अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे या शेतकर्‍यांना उद्यापासून नवीन पिक कर्ज घेणे शक्य होणार आहे. उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समिती यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यावेळी त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. राज्यात मागील आठवडाभरापासून शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांचा हा सर्वात मोठा विजय आहे. यामुळे उद्यापासून सुकाणू समितीने राज्यस्तरावर जाहीर केलेले रस्ता रोको आंदोलन समितीच्या नेत्यांनी स्थगित केले.

कालपर्यंत सुकाणू समितीच्या नेत्यांमध्ये वादावादी सुरू असल्याचे वृत्त येत होते. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये समितीमधील सर्व नेते उपस्थितीत राहणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, कालच सर्व नेत्यांमधील मतभेद संपून आजच्या बैठकीत सुकाणू समितीमधील सर्व नेते उपस्थित होते तसेच मंत्रिगटातीलही सर्व सदस्य उपस्थित होते. या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीचे सूत्र सांभाळली. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर राऊत हेही उपस्थित होते. राज्यातील उर्वरित शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत 25 जुलैपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आणि सुकाणू समितीचे प्रतिनिधी निर्णय घेण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले.

…तर शेतकरी आंदोलन पुन्हा करू
25 जुलैपर्यंत सुकाणू समिती आणि शेतकर्‍यांचे प्रतिनिधी शेतकर्‍यांची एक यादी तयार करतील. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे अशाच सगळ्या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या नावाखाली बिगर शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. मात्र, त्यानंतरही 25 जुलैपर्यंत उर्वरित शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली नाही, तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनासाठी महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावर उतरू, असा इशारा या वेळी सुकाणू समितीच्या सदस्यांनी सरकारला दिला.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी पंतप्रधानांना भेटणार
शेतकर्‍यांनी कायम सरकारवर अवलंबून राहू नये, त्याने स्वयंपूर्ण बनावे यासाठी स्वामिनाथ समितीच्या शिफारसी महत्त्वाच्या समजल्या जातात. त्या समितीच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुकाणू समितीचे सदस्य लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहेत, असे खासदार राजू शेट्टी म्हणाले.

पुणतांब्यासह सर्वांचे मानले आभार
दरम्यान आजचा शेतकर्‍यांचा विजय हा नगर जिल्ह्यातील पुणतांब्यामधून पेटलेल्या वणव्यामुळे प्राप्त झाला आहे. याची आवर्जून आठवण करत समितीच्या सदस्यांनी पुणतांब्यातील शेतकर्‍यांचे आभार मानले तसेच मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, उच्चाधिकार मंत्रिगट या सगळ्यांचे कर्जमाफीबाबत सुकाणू समितीने आभार मानले.

महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा लढा शेतकर्‍यांनी उभारला. या आंदोलनात काही प्रमाणात हिंसेचे प्रकार घडले. मात्र, या सगळ्या आंदोलनाचे फलित चांगले मिळाले आम्ही आनंदी आहोत.
शेतकरी नेते रघुनाथ पाटील

काळे कपडे घालून सुकाणू समिती आणि मंत्रिगटाच्या बैठकीला आलो होतो. मात्र, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे समाधानी झालो आहे. आता सुतळी बॉम्ब वर्षा बंगल्यासमोर नाही तर गावागावांत फोडून हा निर्णयाचे स्वागत करू. स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू होण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे.
आमदार बच्चू कडू

राज्याच्या जनतेची मागितली माफी
महाराष्ट्रातले शेतकरी 1 जूनपासून संपावर गेले होते. आज झालेल्या सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीवर उद्या काय होणार हे ठरणार होते. मात्र, आज सरकारने कर्जमाफीची मुख्य मागणी मान्य केल्याने शेतकरी आंदोलनाची सांगता झाली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकरी संपामुळे जो त्रास झाला त्याबद्दल सुकाणू समितीमधील सर्व शेतकरी नेत्यांनी माफी मागितली.