अखेर सचिनने दिलेली बीएमडब्ल्यू दीपाने केली परत

0

आगरतळा : रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर सर्वांची वाहवा लुटणारी भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने भेट म्हणून मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू कार परत केली आहे. दिपाने बीएमडब्ल्यू परत करुन २५ लाख किंमतीची ह्युंदाई एलांट्रा विकत घेतली आहे. हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्‍यक्ष व्‍ही. चामुंडेश्‍वरनाथ यांनी रिओ ऑलिम्‍पिकमध्‍ये उत्कृष्ट कामगिरी केल्‍यानंतर दीपासह, कुस्तीपटू साक्षी मलिक, बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू यांना बीएमडब्‍ल्यू कार भेटस्वरुपात दिली होती. ही कार या खेळाडूंना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते देण्यात आली होती.

बीएमडब्ल्यू परत करण्यामागे कारण आगरताळामधील रस्त्यांची दुरावस्था ठरले असून शहरात कुठेही बीएमडब्ल्यूचे सर्व्हिस सेंटर नसल्यामुळे दीपाने हा निर्णय घेतला. बीएमडब्ल्यूचे त्रिपुरामध्ये कुठेही सर्व्हिस सेंटर नाही. जर मी कार चालवत असेन आणि काही बिघाड झाला तर मी तो दुरुस्त कसा करणार ? आगरतलामध्ये गाडी चालवण्यासाठी चांगले रस्तेदेखील नाहीत. आगरतलासारख्या छोट्या शहरातील अरुंद आणि छोट्या रस्त्यांवर बीएमडब्ल्यू चालवणे कठीण असल्याची, प्रतिक्रिया दीपाने दिली आहे.