मुंबई:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तीन महिन्याचा कार्यकाळ उलटल्यानंतर देखील अजून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अखेर कोरोनासोबत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हळूहळू काही ऑफिस, खाजगी संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने सलून दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या सलून दुकानात एसी(वातानुकूलित यंत्र) नाही अशा सलून दुकानांना सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, पुढील आठवड्यात याबाबत आदेश निघणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. नाभिक बांधवांकडून सलून दुकाने सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर सरकारने ते मान्य केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सलूनची दुकाने बंद असल्याने सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना लवकरच प्राप्त होणार आहे.