अखेर सहा नगरसेवक भगवे फेटे बांधून करणार सभागृहात प्रवेश

0

मुंबई  । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अचानक राम राम करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांचे शिवसेनेतील प्रवेशावर प्रदीर्घ काळानंतर कायद्याच्या सर्व कसोटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता हे सहाही नगरसेवक येत्या 15 फेब्रुवारी रोजी होणार्‍या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बसणार आहेत. या दिवशी हे सहाही नगरसेवक भगवे फेटे बांधून सभागृहात प्रवेश करणार असून सत्ताधारी शिवसेनेच्या बाकावर बसणार आहेत. या सहा नगरसेवकांमुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे.

मनसेच्या विरोधामुळे रखडलेला प्रवेश
मागील वर्षीच्या 13 ऑक्टोबरला मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून मनसेसह भाजपलाही जोरदार धक्का दिला. मात्र, वेगळा गट स्थापन करून शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची मान्यता मिळणे आवश्यक होते. मात्र, याच वेळी मनसेने आयुक्तांकडे तक्रार करून या सहा नगरसेवकांच्या गटाला मान्यता न देता त्यांचे पद रद्द करावे, त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकांना बसू देऊ नये, अशी तक्रार करण्यात आल्याने त्यांचा पक्षप्रवेश मागील चार महिन्यांपासून रखडला होता.

चार महिने सुरू राहिला वाद
चार महिन्यांपूर्वी मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्‍वर कदम, हर्षला मोरे, अश्‍विनी माटेकर या सहा नगरसेवकांच्या शिवसेनेतील प्रवेशावर काही दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या 93 नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली आहे. तसे पत्र पालिका आयुक्तांना पाठवल्याने पालिका सभागृहात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी तशी घोषणा केली. शिवसेनेचे संख्याबळ आता 87 वरून 93 झाले आहे.