नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर राज्याला असणारा विशेष राज्याचा दर्जा कलम ३७० रद्द करून काढून घेण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांना नजरकैद ठेवण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यानंतर त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. जम्मू – काश्मीर सरकारने नजरकैदेतून सुटका करण्याचा आदेश आज शुक्रवारी जारी केला. कलम ३७० हटविल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी फारूक अब्दुल्ला यांना घरातून अटक करण्यात आली. यानंतर, १५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यांनी त्यांना नजरकैदेतून सोडण्यात आले.
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णंय केंद्र सरकारने घेतल्यानंतर जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) तत्काळ प्रभावाने माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्यासह, त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यंमत्री मेहबुबा मुफ्ती या तिघांना सरकारने त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले होते.
फारुख अब्दुल्ला यांच्या व्यतिरिक्त त्यांचा मुलगा आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशिवाय मेहबुबा मुफ्ती, आयएएस अधिकारी-राजकीय-राजकीय नेते शाह फैसल यांच्याविरोधात पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, शाह फैसल यांच्यासह अनेक नेते ताब्यात आहेत.