जळगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला असून, जळगाव शहर तर कोरोनाचे मुख्य केंद्र बनले आहे. मनपा प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई करत असून, दुकाने, मंगल कार्यालयात गर्दी दिसली अथवा कोणी विनामास्क फिरताना आढळले तर त्यांना दंड ठोठावला जात आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात असली, तरी महापालिकेच्या स्वतःच्या इमारतीमध्ये मात्र, कोरोना प्रतिबंध नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे ‘जनशक्ती’ने बुधवारी, केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे अख्ख्या जळगाव शहराला अक्कल शिकवणार्या महापालिकेला अजून ‘अक्कल’ का आली नाही ? असा गंभीर प्रश्न
उपस्थित होत आहे.
फेब्रुवारी महिना लागताच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. हा प्रादूर्भाव अधिक वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 23 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीसह विविध निर्बंध जळगाव जिल्ह्यात लागू केले आहेत. महापालिकेनेही या निर्बंधांचे पालन न करणार्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गर्दी करणारे कार्यक्रम, तसेच विना मास्क फिरणारे लोक यांच्यावर प्रामुख्याने कारवाई होत आहे. मास्क घातला नाही म्हणून गेल्या पाच दिवसांत जळगाव शहरात 170 जणांना दंड करून त्यांच्याकडून 80 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच जळगावातील मंगल कार्यालये व लॉन्सही सील करण्यात आले आहेत.
जबाबदारी कोण स्वीकारणार ?
महापालिका नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या मास्क घाला, हात धुवा व सामाजिक अंतर पाळा या नियमांचे किती पालन होते याची पाहणी बुधवारी, ‘जनशक्ती’ प्रतिनिधीने महापालिकेत केली. 17 मजली इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात सॅनिटायझरची व्यवस्था नव्हती. तसेच या ठिकाणी बाहेरून येणार्या लोकांच्या शरीराचे तापमान (थर्मल स्कॅनिंग) मोजणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचे दिसून आले. छोट्या लिफ्टमधून एकाचवेळी सात ते आठ प्रवासी वर-खाली करत होते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची सोय नसताना कोरोनाची लक्षणे असलेला पण त्याचे निदान न झालेला एखादा रुग्ण महापालिकेत आला आणि त्याच्या माध्यमातून महापालिकेत कोरोनाचा प्रादूर्भाव झाला, तर ही जबाबदारी कोण स्वीकारणार ? कोरोना लाटेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी बाधित झाले होते हेही विसरता येत नाही. एकीकडे महापालिका प्रशासन लोकांना शिस्त लागावी म्हणून शहरभर दंड आकारत आहे, पण अख्या शहरातला एक न्याय आणि महापालिकेला दुसरा असा न्याय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनपा आयुक्त म्हणतात,
आम्ही लिफ्टमनला आदेश दिले आहेत की, एका वेळेस एका लिफ्टमधून चारच जणांनी प्रवास केला पाहिजे. याच बरोबर सर्वच विभागात सॅनिटायझरची सोय करायला सांगितली आहे, अशी माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण, कंसात जळगाव शहर
20 फेब्रुवारी ः 146 (78)
21 फेब्रुवारी ः 296 (79)
22 फेब्रुवारी ः 319 (158)
23 फेब्रुवारी ः 362 (164)
24 फेब्रुवारी ः 363 (164)