पल्लेकेल । भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून पल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन सामने आधीच गमावलेले असल्यामुळे दीनेश चंडीमलचा श्रीलंकेचा संघ आता व्हाईटवॉशच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुखापतींनी त्रासलेल्या यजमानांना कसोटी मालिकेत आतापर्यत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात त्रिशतकी धावा आणि दुसर्या सामन्यात श्रीलंकेला एक डावाने पराभव पत्कारायला लागला आहे. या पराभवांमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाला आणि देशाच्या क्रीडा मंत्र्याच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. मोठ्या पराभवांमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचे मनोबल खचले असणार यात शंका नाही. न्युमोनीयामुळे पहिल्या सामन्यात खेळू न शकलेला कर्णधार दीनेश चंडीमल म्हणाला की, शेवटच्या सामन्यात भारताला हरवल्यावर खेळाडूंपुन्हा हर्षोल्लासीत होतील. मालिकेतील पहिल्या सामन्यापासून श्रीलंकेच्या खेळाडूंच्या पाठीमागे दुखापतींचा ससेमीरा लागला आहे. पाठदुखीमुळे संघातील प्रमुख गोलंदाज रंगना हेरथला बाहेर बसावे लागणार आहे. याशिवाय अष्टपैलु असेला गुणरत्ने आणि वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपची गैरहजेरी या सामन्यात यजमान संघाला अडचणीत आणू शकते.
कमी लेखणार नाही
भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असली तरी शेवटच्या सामन्यासाठी श्रीलंकेला हलके लेखत नसल्याचे संघाचा यष्टीरक्शक वृद्धीमान सहाने सांगितले. सहा म्हणाला की, मालिका 3-0 अशी जिंकणार याचा विचार केलेला नाही. प्रत्येक सामना आमच्यासाठी वेगळा आणि तेवढाच महत्वाचा आहे. आधीच्या दोन सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीप्रमाणे शेवटच्या सामन्यात खेळ करावा लागेल.
विराट कोहली पहिला कर्णधार
श्रीलंकेत दोन कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर उभा केला होता. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखल्या जाणार्या चेतेश्वर पुजाराने संघाच्या अपेक्शा पूर्ण करताना मालिकेत दोन शतके ठोकली आहेत. भारतासाठी मालिकेत सर्वाधिक 13 विकेट्स मिळवणारा रविंद्र जडेजा आयसीसीने केलेल्या बंदीच्या कारवाईमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताच्या 15 जणांच्या संघात अक्शर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आर. अश्विनसारखा गोलंदाज संघात असताना कुलदीप यादव आणि अक्शर पटेल यांच्यापैकी एकाला स्थान मिळेल.