अगोदर केंद्राने सावरकरांना भारतरत्न द्यावा, आम्ही अभिनंदनाचा ठराव करू; सेनेचा भाजपला प्रत्युत्तर !

0

मुंबई: आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस असल्याने कॉंग्रेसची भूमिका सावरकर विरोधी आहे. मात्र शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वी सावरकरांची बाजू घेतलेली आहे. यावरूनच भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याला सुरुवात केलेली आहे. आज सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून ठराव करण्याची मागणी भाजपने केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रस्ताव आणण्याची मागणी केली. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेना नेते मंत्री अनिल परब यांनी अगोदर केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, त्यानंतर महाराष्ट्र सरकार या सभागृहात केंद्र सरकारचा अभिनंदन करेल असे उत्तर दिले.

स्वातंत्र्यवरी सावरकर यांच्याबद्दल कॉंग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. यावरून सभागृहात गदारोळ झाला.

अधिवेशनात भाजपचे सर्व आमदारांनी’मी पण सावरकर’ टोपी घालून सभागृहात हजर होते. सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी ठराव करण्याचा प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. ‘मी सावरकर’ अशी टोपी घालण्याची भाजपची दुसरी वेळ आहे. मागील अधिवेशनातही भाजप आमदारांनी ‘मी पण सावरकर’ टोपी घातली होती.