सल्लागार नियुक्तीवरुन सत्ताधार्यांवर टीकेची झोड
पिंपरी : कोणतेही छोटे-मोठे विकासकामे करण्याअगोदर पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सल्लागार नेमला जातो. त्यानंतर सल्ला घेऊन कामाचे नियोजन केले जाते. निविदा काढली जाते. परंतु, मोरवाडी येथे दिव्यांगासाठी बांधण्यात येणार्या कल्याणकारी केंद्राच्या कामाची अगोदर निविदा काढली. त्यानंतर भूमिपूजन करण्यात आले आणि आता काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार चव्हाट्यावर आला आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे विविध विकासकामे केली जातात. काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाते. यासाठी पालिकेचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. प्रत्येक गोष्टीसाठी खासगी सल्लागारांची नियुक्ती करून कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. सल्लागार नियुक्तीवरुन सत्ताधार्यांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड देखील उठली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत सल्लागारांच्या नेमणुका सुरुच आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 10 मधील मोरवाडी येथे अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्यात येणार आहे. शहरातील अपंगांसाठी बांधण्यात येणार्या अपंग केंद्रामध्ये तळमजल्यावर चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग तसेच मुलांसाठी खेळण्याचा बगीचा व चौकीदार रूम असणार आहे. पहिल्या मजल्यावर 600 लोकांसाठी मल्टीपर्पज हॉल, स्वागत कक्ष, कार्यालय, जॉईन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व आउटरीच रूमची सुविधा असणार आहे. दुसर्या मजल्यावर अधिष्ठाता केबिन, बहुअपंग क्लास रूम, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. तिसर्या व चौथ्या मजल्यावर सुधार उद्देशक वर्ग, दृष्टी बाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग, व्यवसाय प्रशिक्षण श्रवण व वाचा, भौतिकोपचार व मानसोपचार विभाग आणि टेरेस वर पॅनल कव्हर इत्यादींची व्यवस्था असणार आहे.
या केंद्राचे काम देव कंन्स्ट्रक्शन यांना 8 कोटी 6 लाख 72 हजार रुपयात दिले आहे. 18 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. या केंद्राचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते 3 मे रोजी करण्यात आले. भूमिपूजन झाल्यानंतर केंद्राचे काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार आहे. कल्याणकारी केंद्र बांधणे हे काम विशेष असल्याने तांत्रिकदृष्ट्या आराखड्याप्रमाणे काम करुन घेणे गरजेचे आहे. त्याचे मोजमाप घेऊन देयक तयार करणे, प्रकल्पाच्या दैनंदिन कामावर देखरेख करणे, निविदा पश्चात काम करणे यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी मे.के.बी.पी. सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निविदा पश्चात कामासाठी निविदा रकमेच्या 1.50 टक्के फी अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.23) होणार्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.