धुळे । शहरातील पाचकंदिल परिसरात गेल्यावर्षी घडलेल्या अग्निकांडाच्या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या राम शर्मा यांच्यासह 5 जणांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ठप्प पडला असल्याने यावर जाब विचारीत आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देत नागरीकांनी आंदोलन केले. यज्ञोपवित बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले.26 मार्च 2017 रोजी पाचकंदिल येथील अकबर चौक परिसरात घराला आग लागून पुजारी राम शर्मा यांच्यासह त्यांच्या मातोश्री शोभाबाई शर्मा, जयश्री राम शर्मा, मोठा मुलगा राधे व लहान मुलगा साई असे पाच जण मरण पावले होते.
मार्च 2017 ची घटना
ही घटना शंभर टक्के घातपात असल्याचे म्हणत या अग्निकांड प्रकरणी तपासात पोलिसांनी जाणूनबजून वेळकाढूपणा तसेच अनेक अक्षम्य चुका केल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रमुखांना याबाबत अनेकदा ईमेलव्दारे कळविले असताही आजपर्यंत एकाही मेलला उत्तर दिले नाही. त्यामुळे या घटनेची गांभिर्याने दखल घेवून चौकशी करावी व तपास एलसीबीकडून काढून मुंबई सीआयडीकडे सोपवावा तसेच तपास अधिकारी म्हणून वरीष्ठ अधिकार्याची नेमणुक करावी अशी मागणी या निवेदनातून जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल दिक्षीत, नितीन शर्मा, सुरेश सुर्यवंशी, राजु शर्मा, शामकुमार शर्मा, विजय शर्मा, रमेश कुलकर्णी, हर्षल जोशी, चंद्रकांत पंडीत, वैभव देशपांडे, संजीवानंद पंचारिया,प्रसाद गोरे, कपील शर्मा आदी उपस्थित होते.