अग्निशमन दिनानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली

0

नवी मुंबई । अग्निशमन दलातील जवान तत्परतेने काम करीत आहेत, त्यासोबतच नवी मुंबईकर नागरिकांनीही व्यक्तिगत व सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, असे आवाहन करत अग्निशमन सप्ताहाच्या निमित्ताने ठिकठिकाणी जनजागृतीपर मॉकड्रिल आयोजित करावे, अशा सूचना महापौर जयवंत सुतार यांनी केल्या. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने 14 एप्रिल या अग्निशमन दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल या कालावधीत पाळण्यात येणा-या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या आरंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करत होते.

याप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते रविंद्र इथापे, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापती अंजली वाळुंज, समाजकल्याण समिती सभापती अनिता मानवतकर, नगरसेवक अविनाश लाड, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अग्निशमन अधिकारी जी. टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी लोकांच्या जीविताची तसेच मालमत्तेची हानी रोखणारी अग्निशमन ही अत्यंत महत्त्वाची सेवा असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल कमी अधिकारी-कर्मचारी संख्येत चांगले काम करत असून आता अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणावर तत्परतेने भर देण्यात येत असल्याचे सांगितले.