अग्निशामक दलाचा जवान आग विझवताना जखमी

0

पुणे :कात्रज भागातील एका कंपनीत लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाचा जवान गंभीर जखमी झाला. मंगळवारी (दि.17) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शिवदास खुटवड असे जखमी जवानाचे नाव असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील टेल्को कॉलनीजवळील आर. एस. इंडस्ट्रियल या पावडर कोटिंग निर्मिती करणार्‍या कंपनीला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. कंपनी बंद असल्यामुळे आग विझविण्यात अग्निशामक दलाला अडचण येत होती. आत जाऊन आग विझविण्यासाठी शिवदास खुटवड दरवाजाचे कुलूप तोडत असतानाच आतील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात दरवाजाचा पत्रा खुटवड यांच्या छातीला लागून खुटवड गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ भारती रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कंपनीतील 5 सिलिंडरचा आगीमुळे स्फोट झाला. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आग तासाभरात आटोक्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.