अघोरी पूजेचा डाव उधळला

0

पुणे – गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा करण्याचा डाव सतर्क ग्रामस्थांनी हाणून पाडल्याची घटना बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडली. चार वर्षांपासून बंद वाड्यात ही अघोरी पूजा करण्यात येणार होती. या प्रकरणी अघोरी पूजा करण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह ५ जणांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई न करताच हे प्रकरण मिटवल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुल पळविणारी टोळी

ग्रामीण भागात लहान मुले पळविणारी टोळी आली असल्याची चर्चा आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कर्‍हावागज येथील पुलाच्या बाजूला एक कार संशयास्पद उभी असल्याचे गावातली युवकांना दिसली. त्यानंतर मुले पळवण्याची भीती असलेल्या गावकऱ्यांनी या गाडीत नेमक कोण आहे, याबाबतची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना त्या गाडीत बुवाबाजी करणारा मांत्रिक असल्याचे दिसून आले. मात्र, गाडीतल्या लोकांना संशय आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्या तरुणांनी या परिसराचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ते सर्वजण अंजनगावातल्या चार वर्षापासून बंद असलेल्या एका राजकारण्याच्या वाड्यासमोर मोटारसायकलसह उभे असल्याचे दिसून आले.

ग्रामस्थांनी वाड्यात प्रवेश केल्यावर मांत्रिक आणि त्याचे दोन साथीदार आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संशयास्पद उत्तरे दिली. त्यामुळे ५ जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पूजा गुप्तधन मिळविण्यासाठी, की नरबळी देण्यासाठी करण्यात येणार होती? याची चौकशी पोलिसांनी करणे अपेक्षित होते. मात्र, रविवारी या संशयितांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत काळे यांनी घटनास्थळी संशयास्पद काहीच नव्हते असे कारण सांगून त्यांनी कारवाई करण्याचे टाळल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

दरम्यान, याबाबत कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी तडजोड केल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गुप्तधनासाठी करण्यात येणारी पूजा पन्नास हजारांना पडल्याने गुप्तधन मिळणे तर सोडाच पण जवळ असलेले धनही गेले. मात्र कारवाई टळली असल्याचे समाधान मांत्रिकासह सर्वांच्या चेहर्‍यावर नागरीकांना स्पष्ट दिसत होते.