मुंबई । पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढणार्या किमतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर व्यंगचित्राच्या माध्यमातून हल्ला केला आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी-शहांनी सर्वसामान्यांवर पेट्रोल हल्लाच चढवल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ‘मोदीमुक्त भारता’ची हाक देणार्या राज यांचा कुंचल्याला आणखी धार चढली असून, एका मागोमाग एक व्यंगचित्रातून ते सरकारच्या विविध निर्णयांवर टीका करत आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निमित्ताने राज यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला कुंचल्याचे फटकारे हाणले आहेत.
इंधनाच्या किमतीचा उच्चांक
”जगात तेलाच्या किमती खाली घसरल्या असतानासुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे.” हे निदर्शनास आणतानाच ’बाबांनो, हेच ते अच्छे दिन!’ असा चिमटाही राज यांनी सर्वसामान्यांना काढला आहे. राज यांचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
राज यांनी एका पेट्रोलपंपाचे व्यंगचित्र रेखाटले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एका नागरिकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहेत. अमित शहा हे पैसे घेण्यासाठी त्यांच्या शेजारीच उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. मोदींच्या हातातील पेट्रोल भरण्याचा पंप राज यांनी बंदुकीप्रमाणे दाखवला आहे. धास्तावलेल्या सर्वसामान्य नागरिकांना धाक दाखवून मोदी-शहा जणू वसुलीच करत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रात दाखवले आहे.