भुसावळ। भारताची लोकसंख्या वाढ चिंताजनक असली तरी लोकसंख्या नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग अवलंबून लोकसंख्या नियंत्रणात आणता येईल. भारतामध्ये अच्छे दिन आणावयाचे असतील तर लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे, असे प्रतिपादन भुगोल विभागप्रमुख प्रा.डॉ. शिल्पा पाटील यांनी केले. श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात भुगोल विभागामार्फत आयोजित जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
जनजागृती करण्याचा केला संकल्प
प्रा.डॉ. शिल्पा पाटील पुढे म्हणाल्या की, लोकसंख्या ही विकासासाठी जशी साधक आहे तशीच ती बाधकसुध्दा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे राष्ट्रीय संसाधनांचा वापर बदलतो. निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होवून अंतिमतः राष्ट्रीय विकासही मंदावतो त्यामुळे अच्छे दिन जवळ येण्याऐवजी लांब जातात म्हणून आपण अच्छे दिन येण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. ममता कोळी हिने उपस्थित विद्यार्थीनी, प्रमुख पाहुणे तसेच सहभागी वक्त्यांचे स्वागत केले. स्वाती पाटील हिने लोकसंख्या वाढीची कारणे व परिणाम, अश्विनी गायकवाड व अश्विनी सपकाळे यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी उपाय स्पष्ट केले तर पपिता धांडे हिने लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून त्यासाठी स्वतः जनजागृती करण्याचा संकल्प केला. सुचिता खर्जा हिने अध्यक्षीय मनोगतातून सुखी कुटुंबाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल साखरे हिने केले तर आभार काजल पाटील हिने मानले.
अर्थशास्त्र, वाणिज्य मंडळातर्फेदेखील झाला कार्यक्रम
तसेच अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य मंडळातर्फे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व्यावसायिक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. शरद अग्रवाल हे होते तर भुगोल विभागप्रमुख प्रा.डॉ. शिल्पा पाटील यांनी अध्यक्षस्थान भुषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख सुमित्रा पवार यांनी केले. प्रा.डॉ. पाटील यांनी सांगितले की, आजही समाजात मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी आहे. यावर सर्वांनी चिंतन करुन ही संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यक्रमास प्रा. निता चोरडिया, वाणिज्य मंडळप्रमुख प्रा. एस.आय. महाजन, सदस्य प्रा. डी.एम. ललवणी उपस्थित होते.