नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असताना, प्रायोगिक तत्वावर उदयपूर, जमशेदपूर, पॉण्डेचरी आणि विशाखापट्टणम् या शहरात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे देशवासीयांच्या मनात दरवाढीची भीती कायम असतानाच, शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात 1.39 रुपये तर डिझेलच्या दरात 1.04 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घेतला आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवले होते. परंतु, संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या काळापेक्षा जास्त दराने मोदी सरकारच्या काळात इंधनविक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. स्थानिक कर मिळविता दिल्लीत पेट्रोल 66.29 रुपये तर डिझेल 55.61 रुपये प्रतिलीटर दराने मिळेल. यापेक्षा जास्त दर देशाच्या इतर भागात राहणार आहेत.
पाच शहरात प्रायोगिक अमलबजावणी
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारला पाठवलेला आहे. त्यासाठी देशातील पाच शहरात प्रायोगिक तत्वावर या प्रस्तावानुसार इंधन विक्री करण्याचा शुभारंभ 1 मेपासून होणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर तो देशभरात राबविण्यात येणार आहे. पॉण्डेचरी या केंद्रशासीत प्रदेशासह आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, राज्यस्थानातील उदयपूर, झारखंडमधील जमशेदपूर तसेच चंदीगड येथे 1 मेपासून हा प्रयोग राबविला जाणार आहे. डेली डायनेमिक प्राइसिंग असे या प्रयोगाचे नाव असून, देशाच्या विविध भागातील अनुभव पाहून सरकार पुढील पाऊल उचलणार आहे.
सरासरी दीड ते दोन रुपयांची दरवाढ
दरम्यान, इंधन दरवाढीबाबत माहिती देताना इंडियन ऑईल कार्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सांगितले, की आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी तेल कंपन्यांनी 4.85 रुपयाने पेट्रोलची दरवाढ केली होती. तथापि, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यानंतर पेट्रोल 3.41 रुपयांनी 1 एप्रिलपासून स्वस्त करण्यात आले होते. आतादेखील इंधनाच्या दरात सरासरी दीड रुपयांनी वाढ झाली असून, स्थानिक पातळीवर करांमुळे सरासरी दीड ते दोन रुपयांपर्यंत इंधन महाग भेटणार आहे.