आयएसओ मानांकन मिळविणारी दुसरी पालिकेची शाळा
पिंपरी – नागरिकांच्या दृष्टीने अप्रगत शाळा म्हणून महापालिकेच्या शाळांकडे पाहिले जाते. मात्र, शैक्षणिकदृष्ट्या विचार केला तर मनपाच्या शाळा देखील अध्ययनाच्या बाबतीत आता मागे राहिलेल्या नाहीत. राज्य शासनाने घालून दिलेल्या 24 निकषांची पुर्तता केल्याने अजंठानगर येथील शाळेनी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनपाच्या 106 शाळा आहेत. यातील अपवादात्मक शाळांची विद्यार्थी संख्या घटत आहे. कमी दर्जा समजून नागरिकांचे या शाळांकडे दुर्लक्ष होते आहे. मात्र आता अजंठानगर परिसरातील या शाळेने आयएओ मानांकन मिळविले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्येदेखील उत्तम शिक्षण मिळते आहे, हेच समोर येते आहे.
गुणवत्तेचा टक्का वाढतोय
महापालिकेच्यावतीने उभ्या करण्यात आलेल्या शाळांचा विषय कायम चर्चिला जातो. विद्यार्थी सं÷ख्या घटत आहे, अशी ओरड चालू असते. तरीही झोपडपट्टी भागाच्या लगत असलेल्या शाळांची पटसंख्या सर्वाधिक आहे. परंतु, मनपा शाळांना खासगी शाळांतील अभ्यासक्रमाच्या दृष्टीने दुय्यम स्थान दिले जाते. अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे आकर्षण वाढल्याने विद्यार्थ्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांचा ओढा असतो. जरी खासगी शाळा प्रगत असल्या तरी त्यांना आव्हान देत मनपाच्या शाळा देखील आता मागे राहिलेल्या नाहीत. मनपा शाळेत देखील खासगी शाळांच्या प्रमाणे सर्व सोयी सुविधा व दर्जात्मक अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा टक्का वाढत चालला आहे. हे वर्षानुवर्षे वाढत्या पटसंख्येवरून सिध्द झाले आहे. त्यामुळेच मनपाच्या दोन शाळांनी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त केले आहे.
24 निकष केले पुर्ण
निगडीच्या अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर कन्याशाळा आणि माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा या दोन्ही शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग घेतले जातात. ‘आयएसओ’ मानांकनासाठी शासनाने 24 निकष निर्धारित केले आहे. हे निकष पूर्ण करणारी शाळाच ‘आयएसओ’साठी पात्र ठरते. त्यानुसार ही शाळांनी हे निकष पूर्ण केले आहेत. त्यामध्ये बोलक्या भिंती, गांडुळखत प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, दहा भौतिक सुविधा, गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सौरउर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, संगणक लॅब, डिजीटल वर्ग खोल्या, प्रयोग शाळा, वर्गातील फळे, पाणी पुरवठा, स्वच्छता, मुलांना लिहिता-वाचता येणे आदी निकष घातले आहेत. यासह मागच्या तीन वर्षातील विद्यार्थ्यांची प्रगती, उपस्थिती आणि पटसंख्या, शाळेचे रेकॉर्ड, फाईलींची ठेवण आदी निकषदेखील तपासून पाहिले जाते.
शाळेतील शिस्त जपली जाते
शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी सईद म्हणाल्या की, शाळेची शिस्त ही कायम राहिली पाहिजे यावर रोज लक्ष ठेवले जाते. या शाळेमध्ये 400 मुली व 400 मुले अशी एकूण 800 विद्यार्थ्यांची ही शाळा आहे. कन्याशाळेकडे 10 शिक्षक कार्यरत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडे अभ्यासाबरोबर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येते. त्यासाठी रोज एक दिवसाआड योगा क्लास घेण्यात येतात. त्यासाठी सेंसार कंपनीने योग शिक्षक नेमुन दिले आहेत तेच रोज योगाचे ध़डे विद्यार्थ्यांना देतात. शाळेमध्ये ई-लर्निंग, वाचन संस्कार प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडुळ खत प्रकल्प, पर्यावरण-कुंडी प्रकल्प व औषधी वनस्पतींचे टेरेस गार्डन असे उपक्रम राबविले जातात. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 10 कलमी कार्यक्रमांत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शाळेने मिळविले आहे.
तीन शाळांना मिळाले आयएसओ
अजंठानगर येथील राज्य शासनाच्या 24 निकषांची पुर्तता केली. एकही निकष अपूर्ण असेल तर शाळेची निवड होत नाही. आज रोजी मनपाच्या दोन शाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळालेला आहे. दिवसेंदिवस सर्वच प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे कल आहे. शहरात महापालिकेच्या अन्य जवळपास वीस शाळा आयएसओ मानांकनास पात्र ठरतील, असे शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांनी दिली.