अजंदेतील भ्रष्टाचार बाहेर निघणार?

जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांचे आदेश

रावेर : तालुक्यातील अजंदे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची नव्याने चौकशी करून अहवाल जळगाव जिल्हा परीषदेला सादर करण्याचे आदेश जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिले आहे. आदेशामुळे खळबळ उडाली असून आता नेमका काय भ्रष्टाचार यातून बाहेर निघतो व कारवाई होते ? याकडे अजंदेवासीयांचे लक्ष लागले आहे.

सन 2013 ते 2017 दरम्यान भ्रष्टाचाराच्या तक्रारी
रावेर तालुक्यातील अजंदे ग्राम पंचायतीमध्ये सन 2013 ते 2017 दरम्यान भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रारी जिल्हा परीषदेकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन 25 मे रोजी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी या आर्थिक अनियमिततेची नव्याने चौकशी करून अहवाल जिल्हा परीषदेला सादर करावा, असे आदेश रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना दिले आहेत.

नव्याने होणार भ्रष्ट्राचाराची चौकशी
अजंदे ग्रामपंचायतीच्या सन 2013 ते 2017 या कालावधीच्या लेखा परीक्षणात आर्थिक अनियमितता अथवा अपहार झाला आहे किंवा नाही याची बाबत पडताळणी करण्यात यावी तसेच ग्रामपंचायती अंतर्गत जी कामे करण्यात आली व सदर कामांचे एम.बी. रेकॉर्डीग करतांना स्वाक्षर्‍यांची खाडाखोड करण्यात येवून नवीन एम.बी. रेकॉर्डींग करण्यात आली आहे काय ? याची खात्री करावी, समाज मंदिराचे कामकाज एक लाख इतक्या रकमेचे अंदाजपत्रक असताना हे काम दोन लाखांचा खर्च दाखवून आर्थिक अपहार झाला आहे किंवा नाही ? याची खात्री करावी, 4 डिसेंबर 2020 रोजी चौकशी अहवालात कायम अपहार व वसुलीची कारवाई करण्यात आली तर संशयीत अपहार हा तत्काळ समायोजीत करून संशयीत अपहार नियमीत करून कारवाईचे आदेश देण्यात आले.

चौकशी करून अहवाल पाठवणार : कोतवाल
अजंदे ग्राम पंचायतीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीबाबत पत्र प्राप्त झाले असून याची संपूर्णपणे पारदर्शक पद्धत्तीने चौकशी करून अहवाल जिल्हा परीषदेला पाठवण्यात येईल, असे रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल म्हणाल्या.