अजंदेला आज विविध विकासकामांचा श्रीगणेशा

0

होळनांथे। शिरपूर तालुक्यातील अजंदे बु ॥ (होळनांथे) रमाई आवास योजना, प्रधानमंत्री व राजीव गांधी घरकुल योजने अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील व गरजू लोकांसाठी 4 हेक्टर 52 हजार जागेवर आदर्श घरकुले साकारली असून भुयारी गटारी व सिमेंटच्या रस्त्यांसह मुबलक पाण्याची सोयी सुविधा असलेल्या सदर घरकुलांचा लोकार्पण सोहळा व विविध विकासकामांचे उद्घाटन राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते होत आहे. होळनांथे गावालगतच असलेले व अनेर नदीच्या काठावर वसलेले अजंदे बु ॥ हे एक प्रगतशील गाव. गावात जिल्हा परिषदेच्या डिजीटल शाळेसह, दोन माध्यमिक विद्यालये, ज्युनिअर कॉलेज व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून आरोग्य व शिक्षणाच्या कामानिमित्त परिसरातील लोकांची येथे नेहमी वर्दळ असते. गावात रमाई प्रधानमंत्री व राजीव गांधी योजनेअंतर्गत 180 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यातून अनेकांनी आपल्या खाजगी जागेत घरकुले बांधली परंतु बहुसंख्ये लोकांकडे जागा नसल्याने त्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळूनही बांधकामे बाकी होती परंतु सरपंच चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने भावेर रस्त्यालगत असलेल्या गावठाण परंतु डोंगरदरीच्या जागेवर लेव्हलींग करून आदर्श अशी घरकुले साकारलीत. या घरकुल परिसरात सामाजिक सभागृहासह सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भुयारी गटारी व प्रत्येक गल्लीील रस्त्यात सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात आले आहे.

शासन निर्णयापेक्षा अधिक बांधकाम
शासन निर्णयानुसार प्रत्येक लाभार्थ्याला 95 हजार रूपये घरकुल बांधण्यासाठी तर 12 हजार रूपये शौचालय बांधण्यासाठी दिले जातात. यात बांधकामोच क्षेत्रफळ किमान 269 चौरस फुट असणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतीने त्याच रकमेत 365 चौरस फुटाचे आरसीसी दर्जाचे बांधकाम करून त्यात संडास, बाथरूम, ओटासह, काँक्रेटरस्ता, भुयारी गटारी, सार्वजनिक नळ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून आरसीसी कॉलम असल्याने लाभार्थी दुसर्‍या मजल्याचेही काम करू शकतात. अशा या घरकुल परिसरास भुपेशभाई नगर असे नाव देण्यात आले आहे.

भविष्यातील विविध कामे
सदर घरकुल वस्तीत समाजमंदिरासह शॉपींग गाळे बांधण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला असून पाण्यासाठीही स्वतंत्र बोअरवेल करण्यात येणार आहे. तसेच सदर घरकुल परिसरास संरक्षण भिंत बांधल्यास एक आदर्श वसाहत निर्माण होणार आहे.

घरकुलांचे श्रेय ग्रामस्थांना
विविध योजनेतील 180 घरकुले मंजुर झालेत. त्यात अनेकांकडे जागा नसल्याने गावठ वस्तीतील डोंगर दरीची जागा लेव्हलींग करण्याचा विचार आला व ग्रामस्थांच्या पुर्ण पाठींबाने ही घरकुल योजना आज साकारली आहे.
चंदक्रांत पाटील, सरपंच

सर्व जाती-धर्माचा समावेश
अजंदे बु॥ गावात सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहत असून घरकुल योजनेतही सर्व जाती-धर्माच्या लाभार्थ्यांना समान लाभ देण्यात आला असून सामाजिक एकतेचे दर्शन या ठिकाणी होणार आहे.
तुळशिराम मराठे, उपसरपंच

मान्यवरांची उपस्थिती
आज सायंकाळी भुपेशभाई नगरात आयोजित घरकुलांचा लोकार्पण सोहळा व विविध विकासकामांचे उद्घाटन माजी शालेय शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते असून यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, आ.काशिराम पावरा, शिवपाचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पं.स.सभापती रूलाबाई पावरा, उपसभापती संजय पाटील, प्रांताधिकारी नितीन गावंडे, तहसिलदार महेश शेलार, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, गटविकास अधिकारी एम.डी.बागुल, हभप समाधान महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.