गावभर रंगत आहे राजकीय चर्चा
होळनांथे । अजंदे बु. येथील निवडणुकीत महिन्याभरापेक्षा कमी वेळ राहिला असू १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. परिणामी परिसरात निवडणुकीसंदर्भ विविध विषय चर्चीले जात असून कोणत्या वॉर्डात कोणता उमेदवार उभा आहे याचा शोध मतदार घेत आहेत.
प्रथमच सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेच्या माध्यमातून होत असल्याने निवडणुकीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत सदस्याद्वारे सरपंचाची निवडणूक होत असतांना सरपंचाचा खरा चेहरा निवडणुकी नंतरच स्पष्ट होत असे परंतु प्रथमच सरपंचाची निवड जनतेतून होत असल्याने लोकांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला सरपंचपदासाठी प्रत्यक्ष मतदान करता येणार आहे.
मोर्चे बांधणीला वेग
पंधरात सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत असून पॅनलप्रमुख उमेदवारांची वॉर्डनिहाय निचिती करीत आहेत. यात योग्य व जनतेच्या कामात येणार्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जात असून उमेदवारांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यात येत आहे. समाजसेवक, जनतेच्या कामात येणार्या उमेदवारांबरोबरच काही हवश्या-गवश्या लोकांचीही उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत आहे.
विकासाच्या मुद्यावर निवडणूक
अजंदे बु । ग्रामपंचायतीत आजपर्यंत काँग्रेस प्रणीत पॅनेलचे वर्चस्व आहे. प्रथमच काँग्रेस प्रणीत पॅनेलच्या विरोधात भाजप प्रणीत उमेदवार उभे राहत असल्याने या निवडणुकीला खरे राजकीय स्वरूप मिळणार आहे. सत्ताधारी काँग्रेस पॅनलने विविध विकासकामे केली असून राज्यात आदर्श अशी घरकुल योजना साकारली आहे. काँग्रेसचे उमेदवार विविध विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत असून भाजप पुरस्कृत उमेदवारांना अद्याप जाहिरनामा तयार नसल्याचे कळते.