भुसावळ- अप व डाऊन अजनी-पुणे एक्स्प्रेसला नांदुरा रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर 8 मार्चपासून थांबा देण्यात आल्याने या भागातील रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली जात होती.
एका मिनिटासाठी थांबा
गाडी क्रमांक 22123 व 22124 अजनी-पुणे एसी एक्सप्रेसला 8 मार्चपासून सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर हा थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक डाऊन 22123 नांदुरा येथे 11.54 वाजता आल्यानंतर 11.55 वाजता अजनीकडे रवाना होईल. ही गाडी दर शुक्रवारी धावणार असून अप 22124 अजनी-पुणे एक्स्प्रेस रात्री 12.34 वाजता नांदुरा येथे आल्यानंतर 12.35 वाजता पुण्याकडे प्रस्थान करेल. दर बुधवारी ही गाडी धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.