अजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक

0

जळगाव: जिल्हा परिषदेच्या मालकीचे पांझरा तलाव, साठवण बंधारे तसेच विविध जलसिंचन प्रकल्पाच्या कामातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजे तसेच वाळूची वाहतूक करण्यात आलेली आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून कोट्यवधींचा अपहार झाल्याचे आरोप जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप केले. माहिती अधिकारातून हा घोळ उघड झाला असून याबाबत त्यांनी माहिती अधिकारातून मिळविलेली मागितले कागदपत्रे दाखविली.

दुचाकीच्या परवान्याने गौण खनिज वाहतूक
जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सिंचन विभागामार्फत करण्यात आलेल्या कामातून उपसा करण्यात आलेल्या गौण खनिजांच्या वाहतुकीची माहिती मागितली. माहिती अधिकारात देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये चक्क दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या परवान्यांचा मुरूम आणि वाळू वाहतूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. दुचाकी, तीनचाकीच्या परवान्यांवरून चक्क दोन ते तीन ब्रासपर्यंत मुरूम आणि वाळू वाहतूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एकाच वाहन चालकाच्या नावाने आठ ते दहा वाहनांची वाहतुक करण्यात आल्याचा अजब कारभार यातून उघड झाले आहे.
पांझरा तलावात रॉयल्टीचा घोळ   
पांझरा तलावाच्या कामातून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा झालेला आहे. मुरूम उपासासाठी 50 टक्के रॉयल्टी जिल्हा परिषदेकडे जमा करण्यात येते. जमा झालेल्या रॉयल्टीच्या पावत्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहिती अधिकारातून मागितल्या आहेत परंतु ते देण्यास सिंचन विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचे आरोप सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला. कोट्यवधींचा हा रॉयल्टी घोटाळा असल्याचे आरोपही त्यांनी केला. रॉयल्टीचा प्रश्न जि.प.च्या प्रत्येक सभेत उपस्थित केला जातो, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या
गौण खनिज वाहतुकीसाठी परवाने देण्यात आलेले आहे, मात्र पाचोरा तहसिलदार यांच्या नावाने बनावट शिक्के आणि स्वाक्षरीच्या माध्यमातून बोगस परवाने दिल्याचे आरोप पल्लवी सावकारे यांनी केला. महसूल विभागाच्या शिक्क्यांमध्ये ‘सत्येमय जयते’चा कोठेही उल्लेख नसून हा देशद्रोह असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सावकारे यांनी सांगितले.