अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये प्रचार सभा झाली. युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मोदी नगरमध्ये आले होते. या सभेत काळ्या रंगाचे कापड घातलेल्याना प्रवेश देण्यात येत नसल्याचा प्रकार दिसून आला. काळा रंगाचे कपडे असणाऱ्यांना ते काढण्यास सांगितले जात होते असे वृत्त ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. काळ्या रंगाचे कपडे नाकारण्यात आल्याने अनेकांनी घातलेल्या काळ्या रंगाच्या बिनियान आणि सॉक्स काढल्यानंतरच त्यांना मैदानात प्रवेश देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
या आधीही अनेकदा मोदींच्या सभेच्या ठिकाणी नागरिकांना काळे कपडे घालून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात भोपाळमध्ये झालेल्या सभेतही अशाच प्रकारे लोकांना काळे कपडे घालून मोदींच्या सभेच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. काही दिवसापूर्वी कानपूर येथे झालेल्या सभेमध्येही हाच नियम लागू करण्यात आला होता.