अजमेरा इमारत न्यायालयासाठी देण्यात यावी

0

पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनची मागणी

पिंपरी-चिंचवड : येथील अजमेरा सोसायटीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची इमारत आहे. ही इमारत पिंपरी न्यायालयासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी कमीत कमी शुल्कात भाड्याने देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनदेखील देण्यात आले आहे.

तातडीची गरज ओळखावी
पिंपरी न्यायालयाच्या संकुलासाठी पेठ क्रमांक 14 मधील मौजे मोशी-बोर्‍हाडेवाडी येथे सुमारे 15 एकर जमीन घेतली आहे. परंतु, अजून याठिकाणी पिंपरी न्यायालय स्थलांतरित झाले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेसाठी वकील झटत आहेत. न्यायालय संकुलासाठीच पिंपरी अजमेरा येथील महापालिकेची तयार इमारत आहे. तरी न्यायालयाच्या इमारतीचे नवीन बांधकाम जोपर्यंत होत नाही; तोपर्यंत कमी शुल्क आकारून ही इमारत भाड्याने देण्यात यावी. तातडीची गरज ओळखून व आवश्यक बाब असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याकडे पत्र तसे दिले आहे.

नागरिक, पक्षकारांची धावपळ थांबेल
महापालिकेने जर ही जागा दिली तर 10 कोर्टांचे कामकाज याठिकाणी सुरू करता येईल. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना न्यायासाठी शहराच्या बाहेर जाऊन न्याय मागावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. शहरातील नागरिकांना व कामगारवर्गाला त्यांचे प्रश्न व न्याय मागण्यासाठी पुणे येथील औद्योगिक न्यायालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. नागरिकांना व पक्षकारांना कौटुंबीक समस्या सोडविण्यासाठी तसेच ग्राहकांना न्यायासाठी पुणे येथील न्यायालयात जावे लागत आहे. यासाठी तातडीने याबाबत कार्यवाही व्हावी, असे निवेदनात नमूद केले आहे.