अजमेर एक्स्प्रेसमधून लाखाचा ऐवज लांबवणारे चौघे सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात
सतर्क रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई : अटकेतील आरोपींमध्ये महिलेचा समावेश
भुसावळ : पुरी-अजमेर एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशांची पर्स लांबवणार्या नंदुरबारच्या चौघा चोरट्यांना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेत लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात सोपले आहे. संशयीतांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. विक्रम, कार्तिक व अविनाश व लक्ष्मी नायडू अशी अटकेतील संशयीतांची नावे असून ते नंदुरबारचे रहिवासी आहेत. अटकेतील महिला गर्भवती असल्याची माहिती आहे.
लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
सुरत येथील रहिवासी पूजा आव्हाड ही माहिला पुरी-अजमेर एक्स्प्रेस या गाडीच्या एस-4 या डब्यातील सीट 78 वर बसून प्रवास करीत असताना भुसावळ स्थानक येण्यापूर्वी रात्री 12.10 वाजता झोपली असताना पर्स लांबवण्यात आली. भुसावळ येथे हा प्रकार आल्यावर या महिलेने भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. पर्समध्ये मोबाईल, चार्जर, मंगळसूत्र असा सुमारे 95 हजारांचा ऐवज होता. मलकापूर येथून एक महिला व तीन युवक गाडीत चढल्याने त्यांच्यावर संशय महिलेने वर्तवला होता. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास आरपीएफ उपनिरीक्षक अनिल तिवारी, इम्रान खान, भूषण पाटील, मनिष कल्याणी हे रात्री स्टेशनवर गस्त करीत असतांना त्यांना प्लॅटफॉर्म सातवर एक महिला व तीन युवक बसलेले दिसले.फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनाचे हे चारही असल्याने त्या चारही जणांची चौकशी केली असता त्यांच्याजवळून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरपीएफने जप्त केलेला माल व संशयीतांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.