नवी दिल्ली । अजमेर दर्गा बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांची मुक्तता करण्यात आली आहे. स्वामी असीमानंद यांच्यासोबत अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं आहे. सुनील जोशी ज्यांचं आधीच निधन झालं आहे त्यांच्यासोबत भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालय आज निकाल सुनावणार असल्याने सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. न्यायालय याप्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी आपला निकाल देणार होतं. मात्र, कागदपत्र आणि साक्षीदारांच्या जबाब लिहिण्यासाठी जास्त वेळ लागणार असल्याने न्यायालयाने 8 मार्च ही निकालाची तारीख अंतिम केली होती.
11 ऑक्टोबर 2007 रोजी अजमेर येथील प्रसिद्ध सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाली आहे. दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन रिमोट बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी केवळ एकाच बॉम्बचा स्फोट झाला.
या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास राजस्थान एटीएसने केला होता. या तपासादरम्यान एटीएसने 2010 साली तीन आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक केली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2010 साली याप्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल झाले. मात्र, एप्रिल 2011 मध्ये गृहमंत्रालयाने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून घेत एनआयएकडे सोपवला.
एनआयएने तपासास सुरुवात केल्यावर स्वामी असीमानंद, हर्षद सोळंकी, मुकेश बसानी, भरतमोहनलाल रतेश्वर, भावेश अरविंदभाई पटेल आणि मफत ऊर्फ मेहूल यांना अटक केली होती. याप्रकरणी एनआयएचे विशेष न्यायालय शनिवारी आपला निर्णय सुनावणार होते, पण प्रकरणाचे गांभीर्य पाहता साक्षीपुराव्यांच्या अभ्यासासाठी अजून काही वेळ लागेल, असे सांगत विशेष न्यायालयाने निकाल बुधवारपर्यंट टाळला होता.