मुंबई । सोनू निगमच्या ट्विटवरुन देशभरात अजानचा मुद्दा चर्चेत आहे. मशिदीवरील मोठ्या आवाजातील अजानवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने अल्पसंख्यांक असल्यामुळे आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी मोठ्या आवाजाने लक्ष वेधावे लागते, असे म्हटले आहे. सैफ म्हणाला की, ‘मी दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे समजतो. एका बाजूच्या अजानवेळी लाउडस्पिकरचा आवाज कमी असावा या विधानाशी मी सहमत आहे. मला याचीही जाणीव आहे की, अजानच्यावेळी मोठा आवाज असुरक्षिततेच्या भावनेमुळे निर्माण होतो. आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात ही परिस्थिती आहे.’
सैफकडून इस्रायलचा दाखला
यावेळी त्याने इस्रायलचा दाखला दिला. त्या देशात तीन धर्माचे लोक राहतात, त्याठिकाणी देखील अजान लाउडस्पीकरनेच केली जाते. सैफच्या मते, अल्पसंख्याक अजानच्या माध्यमातून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासह त्यांना स्वीकार व्हावा म्हणून ते हे सर्व करतात. त्यामुळे अजानच्या आवाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, तर काहींच्या भावना उग्र होणे स्वाभाविक आहे.
सैफच्या मुलाचे नावही चर्चेत
अजानवेळी लाउड स्पीकरच्या आवाजाने त्रास होत असल्याचे ट्विट सोनू निगमने केले होते. त्याच्या ट्विटनंतर अजानचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर सोनूने अजानचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सैफ अली खानचा शाहिद कपूर आणि कंगना रणौतसोबतचा रंगून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यावर काही दिवसांपूर्वी सैफच्या मुलाच्या नावाची चर्चा रंगली. सैफने आपल्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यामुळेही वाद निर्माण झाला होता. छोट्या नवाबाच्या नावासंदर्भात रंगलेल्या तर्क वितर्कावर सैफने खुलासाही केला होता.
नव्याने वादविवाद
सैफ अली खानच्या या विधानामुळे अजानसाठी ध्वनीवर्धकांच्या वापराच्या वादाला नव्याने मुद्दे मिळाले आहेत. सोनु निगम व सैफ अली खान या कलावंतांनीच हा मुद्दा समाजासमोर पुन्हा चर्चेत आणल्याने त्यांचे चाहतेही मतमतांतरे व्यक्त करीत आहेत. समाजमाध्यमांवर तर ही लोकांना ‘ कामाला’ लावण्याची सत्ताधार्यांचीच चाल असल्याची मते व्यक्त होत आहेत. राजकीय सत्तेचीच या गदारोळाला फूस असावी, असा आरोप होत असला तरी सत्ताधारी अथवा विरोधी नेत्यांपैकी कुणीही जाहीरपणे याबाबतीत अद्याप फारसे काहीही बोललेले नाही