अजान आणि धार्मिक गोंगाटाविरुद्ध ट्विटचा वाद

0

मुंबई। सोनू निगमच्या ट्वीटचा वाद काही थांबेना. त्याच्या मशिदीमध्ये होणार्‍या अजानविरोधात ट्विट विरोधात अनेकांनी आगपाखड केली. त्याचे मुंडन करून त्याला चपलांचा हार घालणार्‍यांना 10 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तर त्यानेही त्याला प्रत्यूत्तर देत स्वतःच मुंडन करून घेतले आणि 10 लाख रूपये तयार ठेवा असे आव्हाण दिले.

त्याचे हे ट्विट धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे मतही मांडण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सोनू निगमने पत्रकार परिषद घेतली आणि या ट्विट प्रकरणी त्याची भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकालाच त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे असे सांगत सोनूने आपल्या भावनांचा आणि ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे म्हटले. नंतर सोनूने सर्वांनाच थक्क करत दिल्या शब्दाप्रमाणे मुंडन करत स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केल.

‘कोणालाही दुखावण्याचा, कोणत्याही धर्माची निंदा करण्याचा माझा हेतू नाहीये. त्यासोबतच कोणाचाही अनादर करण्यासाठी मी ते ट्विट केले नव्हते. मुळात माझा विरोध आहे लाउडस्पीकरला, त्यामुळे होणार्‍या मोठ्या आवाजाला,’ असे म्हणत सोनूने लहानसहान गोष्टींना उगाचच हवा देऊन त्याचा बोभाटा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.