अजान महत्त्वाचा; भोंगा नाही!

0

नवी दिल्ली : जेव्हा मुस्लीम धर्माची स्थापना झाली तेव्हा वीज आणि मायक्रोफोन नव्हता. त्यामुळे मुस्लीम धर्मामध्ये भोंगा हा अविभाज्य घटक नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गायक सोनू निगमला मोठा दिलासा मिळाला आहे. मशिदीमध्ये होणार्या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर सोनू निगमविरोधात उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण या प्रकरणात सोनूला न्यायालयाने दिलासा देत क्लीनचिट दिली.

सोनू निगमचे ट्विट अजानविरोधात नाही तर भोंग्याविरोधात होते!
मुस्लीम धर्मात अजानसाठी वापरण्यात येणार्या भोंग्यावर प्रश्न उपस्थित केल्याने गायक सोनू निगम चर्चेत आला होता. सोनूच्या त्या ट्विटविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला होता. हरियाणातील आस मोहम्मद यांनी तर उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर निर्णय देताना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सोनू निगमच्या बाजूने कौल दिला. सोनूने मुस्लीम धर्मातील अजानविरोधात ट्विट केले नसून, भोंग्याविरोधात केल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. सोनूने केलेल्या ट्विटवरून त्याला बळीचा बकरा बनवला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकरणांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. संविधानानुसार देशात एकता, समता आणि बंधुभावाचे संरक्षण करण्याची गरज असल्याचेही उच्च न्यायालयाने नमूद केले.

सोनूचे शब्द आवाजासंदर्भात होते
तसेच अजान हा मुस्लीम धर्माचा अविभाज्य भाग असला तरी भोंगा हा मुस्लीम धर्माचा महत्त्वपूर्ण घटक नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. सोनूने जे शब्द वापरले आहेत ते अजानसंदर्भात नसून, भोंग्यावरील आवाजासंदर्भात होते, त्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.