अजिंठा घाटात 7 तास वाहतूक ठप्प

0

औरंगाबाद । अजिंठा घाटात दर्गाजवळ नादुरुस्त झाल्याने उभ्या असलेल्या एका ट्रकला समोरुन येणार्‍या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पहाटे 5:30 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 7 तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर अजिंठा पोलीस घटनास्थळी सकाळी 7:30 वाजेला पोहोचले. 5 तासानंतर सकाळी 10 वाजता क्रेनने अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी 12 वाजता येथील वाहतूक सुरळीत झाली.

जखमी औरंगाबादच्या रुग्णालयात
या अपघातात जखमी झालेले दोघेही गुजरातमधील रहिवासी आहेत. जखमींंना औरगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. भाजीपाल्याने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे.19- यू 3452) भुसावळहून पुणे येथे जात होता. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याशेजारी चालक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते. औरंगाबादहून जळगावच्या दिशेने येणार्‍या ट्रकची ( क्रमांक एम एच 28- बी 8055) तेथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे 7 तास ताटकळत बसावे लागले, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.