अजिंठा चौफुलीजवळ एसटी चालकाला मारहाण

0

जळगाव। किरकोळ कारणावरून औरंगाबाद-जळगाव एसटीचालकाला टॅम्पो ट्रॅव्हल्स चालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अंजिठा चौफुलीजवळ घडली. मारहाणीत एसटीचालकाच्या हाताला व बोंटांना गंभीर दुखापत झाली आहे. तर याप्रकरणी एसटीचालकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

ओव्हरटेक करण्यावरुन झाला वाद
औरंगाबाद-जळगाव बस (क्रं. एमएच.40.एन.9795) वरील चालक भिकन बाळा इंगळे प्रवासी घेवून औरंगाबादकडून जळगावकडे येत होते. शहरात दाखल झाल्यानंतर काशिनाथ लॉजजवळ एसटीचालक इंगळे यांनी पुढे चालणार्‍या टॅम्पो ट्रॅव्हल्सला (क्रं. एमएच.04.9778) ला ओव्हरटेक करून पुढे निघून गेले. त्यानंतर अंजिठा चौफुली येथे प्रवाश्यांना सोडण्यासाठी इंगळे यांनी बस त्याठिकाणी थांबविली. परंतू ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ कारणावरून टॅम्पो ट्रॅव्हल्सचालकाने महामार्गावर टॅ्रव्हल्स थांबवून एसटीचालकाला एसटीतून बाहेर ओढत वाद घातला आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. काहीही कारण नसतांना टॅम्पो ट्रॅव्हल्सचालकाने मारहाण केल्याने इंगळे यांच्या हाताला व त्यांच्या हाताच्या बोटांना जबर दुखापत झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर भिकन इंगळे यांनी जळगाव आगारात जावून कर्मचारी व अधिकार्‍यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. अधिकारी कर्मचारी तसेच एसटीचालकाने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत टॅम्पो ट्रॅव्हल्स (क्रं. एमएच.04.9778) वरील चालकाविरूध्द तक्रार दाखल केली आहे.