मध्यरात्रीची घटना ; दुचाकीवरुन आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव- शहरातील अजिंठा चौफुलीजवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ लावलेला उभा ट्रक चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास समोर आला आहे. दरम्यानय दुचाकीवरुन आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे
मेहरूण परिसरातील गणेशपुरी भागात राहणारे मोहम्मद सलीम शरीफ शेख यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच.26.एच.6669 हा त्यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ लावला होता. शनिवारी रात्री 10.30 पर्यंत ट्रक त्याचठिकाणी होता. रविवारी पहाटे शेख ट्रकजवळ आले असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी शेख यांनी एमआयडीसी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
हॉटेलच्या सीसीटीव्हीत प्रकार कैद
दरम्यान, रविवारी सकाळी शेख यांनी परिसरात असलेल्या एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पहाटे 2.45 ते 2.50 दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ट्रकमध्ये प्रवेश केला आणि ट्रक लंपास झाल्याचे कैद झाले आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांचे आव्हान
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील डीबी स्टाफ सध्या गुन्हे शोधमध्ये आघाडीवर आहे. अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहे. परंतु एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणारी डिझेल चोरी, भुरट्या चोर्या आणि वाहन चोरी रोखण्यात ते हतबल झाल्याचे या घटनेवरुन समोर आले आहे. चोरट्यांच्या करामती सुरूच या घटनेतून त्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.