मुक्ताईनगरातील राष्ट्रवादी कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत
जळगाव – मुक्ताईनगर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी माघार घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांचा फोन आल्याने आपण माघार घेतली असल्याचा गौप्यस्फोट अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली. रवींद्रभैय्यांच्या माघारीमुळे मुक्ताईनगर मतदारसंघातील कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असुन ते तीव्र संताप व्यक्त करीत आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघातुन भाजपाकडुन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर याच मतदारसंघातुन शिवसेनेतुन बंडखोरी केलेल्या जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी देखिल खडसेंविरोधात अर्ज कायम ठेवला आहे. या मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दि. ३ रोजी पक्षाचे नेते आ. अजित पवार यांच्या सुचनेनुसार रवींद्र पाटील यांनी अर्ज देखिल भरला. मात्र काल दि. ६ रोजी सकाळी ११ वा. आ. अजित पवार यांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्याची माहिती रवींद्र पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली. पक्षनेतृत्वाच्या या आदेशामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहे. काही जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. वरीष्ठांनी माघार का घ्यायला लावली? हा प्रश्न मला देखिल पडला असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले.