अजितदादांच्या दबावतंत्राला पुणे काँग्रेस दाद देईना!

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पुणे शहर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा केला आहे. पण, अजितदादांच्या दबावतंत्राला पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी दाद दिलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात चढाओढ लागली आहे. काँग्रेसकडे निवडून येण्याच्या क्षमतेचा उमेदवार नाही व नगरसेवकांची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच पुण्यावर दावा करू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे राहाणार अशी हवा काही महिने अगोदर राजकीय वर्तुळात होती. पण, आपण इच्छुक नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्यावर काँग्रेसमधील इच्छुकांनी सुस्कारा सोडला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या पुणे लोकसभा मतदारसंघात नगण्य आहे. त्यांचे 20हून अधिक नगरसेवक बारामती व शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रभागांमधून निवडून आलेले आहेत. शहरात काँग्रेसचा पाया पक्का आहे. काँग्रेसकडे 5 सक्षम इच्छुक उमेदवार आहेत. मोदी लाटेतही काँग्रेसला 2.5 लाखाहून अधिक मते मिळाली होती; असे काँग्रेसचे म्हणणे आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या चार जागा आहेत. शहर वगळता उरलेल्या तीन जागा राष्ट्रवादीकडे आहेतच, आता शहराची जागाही याच पक्षाला दिली तर पुण्यातून काँग्रेस शून्य होईल. याकरीता काँग्रेस नेते जागा देण्यास तयार नाहीत. पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभांमधून पुण्याची जागा आम्ही राष्ट्रवादीला देणार नसल्याचे सांगितले.

पवार स्वतः इच्छुक नाहीत

काँग्रेसच्या गोटात असे बोलले जाते की, पुण्याची जागा घेण्यास पवार स्वतःच इच्छुक नाहीत. मात्र नगरच्या जागेसाठी दबावतंत्र म्हणून अजित पवारांमार्फत पुण्याच्या जागेसाठी मागणी होत आहे. अजित पवारांचा सध्या कोल्हापूर, सातारा, सांगली दौरा सुरू आहे. या दौर्‍यातच त्यांनी पुण्यासाठी दावा केला आहे आणि पुन्हा एकदा येथील जागेचा नक्की दावेदार कोण? ही चर्चा सुरू झाली आहे.