पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या पुरोगामित्वामुळे विविध जाती-धर्माची माणसे राजकारणात मोठी होऊ शकली. राज्याला प्रगतशील, संपन्न करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे. पवारसाहेबांच्या राजकीय संस्कारातूनच अजित पवारांची वाटचाल झाली. राज्याचे नेतृत्व पुढील काळात अजितदादांच्याच हातात सुरक्षित राहील, असे प्रतिपादन पुण्याचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता एकबोटे यांनी केले. दैनिक जनशक्तिच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. त्याच्या प्रकाशनप्रसंगी श्री एकबोटे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विनायकराव चाचर, गोपाल चव्हाण यांच्यासह निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्याचे नेतृत्व अजितदादांच्याहाती सुरक्षित!
दत्ताजी एकबोटे म्हणाले, आपण मूळचे समाजवादी विचारसरणीचे असलो तरी शरद पवारांचा हात धरून त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसमध्ये आलो. पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हाही त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत आलो. पवार हे जहाजाचे उत्तम कप्तान असून, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार्या व्यक्तीचा कधी विश्वासघात झाला नाही. महाराष्ट्राचे भले करण्याची क्षमता पवारांमध्ये आहे. त्यांच्याच नेतृत्वात हा पुरोगामी महाराष्ट्र विकासाच्या शिखरावर पोहोचला. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. विकासाची धोरणे होती. आजच्या भाजप नेतृत्वाकडे यापैकी काहीही नाही. पवारांच्या राजकीय संस्कारातूनच अजित पवारांची जडणघडण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नेतृत्व अजितदादांच्या हातात सुरक्षित राहील. त्यांच्यातील प्रखडपणा कधी कधी तीव्र होत असला तरी, अलिकडे त्यांच्यात पोक्तपणा आला आहे. वयाच्या 58व्या वर्षीही ते तरुणांचे नेते आहेत. भविष्यात सत्ता आली तर त्यांच्या नेतृत्वातच राज्याची सुखावह वाटचाल होईल, असे मतही एकबोटे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीला पुणे पॅटर्न भोवला!
राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात भाजपसोबत सत्तेसाठी गाठ बांधून घेऊ नये, या विचाराला आपण प्रखडपणे मांडले. राष्ट्रवादीची सत्ता जाण्याला हा पुणे पॅटर्नच कारणीभूत आहे. राष्ट्रवादीचा अस्त आणि भाजपचा पुण्यात उदय या पॅटर्नमुळेच झाला, असे प्रखड मतही दत्ताजी एकबोटे यांनी मांडले. आता चुका सुधारून पुढे या. भाजपला छुपी आणि उघड साथ देऊ नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा खोटारडा असून, त्यांनी पद्धतशीरपणे देश ताब्यात घेतला आहे. या देशाचा राष्ट्रप्रमुख, पंतप्रधानदेखील त्यांनी आपला स्वयंसेवक केला आहे. त्यांच्या खोटारडेपणा आणि भावनिक मुद्द्याला आता बळी पडू नये, अशी सादही त्यांनी घातली. येत्या काळात दलित, शेतकरी, कामगारांना एकत्र घेऊन जाण्याचे काम अजित पवारांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.