अजित पवारांच्या बंडाला जिल्ह्यातूनही पाठींबा

0

राष्ट्रवादीचे आ. अनिल पाटीलांची शपथविधीला उपस्थिती : राकाँ पदाधिकार्‍यांकडून नाराजी

जळगाव – राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आमदार अजित पवार यांनी केलेल्या बंडाला जळगाव जिल्ह्यातूनही मिळाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे देखिल आ. अजित पवारांसोबतच असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आज सकाळी झालेल्या शपथविधीसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांकडुन ‘नो कॉमेंट्स’ अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शपथविधीचा कार्यक्रम घटनाविरोधी असल्याचे सांगितले आहे.
राज्यात भल्या पहाटे मोठी राजकीय उलथापालथ झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आ. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय आगडोंब उसळला. राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवारांविरोधात मुंबईत जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही आ. अजित पवारांच्या या भूमिकेविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोष व्यक्त केला आहे. तर शिवसेनेच्या आमदारांनी मात्र सावध भूमिका घेत ‘नो कॉमेंट्स’ सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अनिल पाटील पवारांसोबत

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे आज राजभवनावर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहील्याचे प्रसारमाध्यमांवर दिसून आले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसापासून सत्ता स्थापनेसंदर्भात बोलणी सुरू होती. मात्र काँग्रेस पक्षाकडुन ठोस निर्णय होत नसल्याने शिवसेना भाजपासोबत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी रात्री दीड वाजता भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही 15 आमदार आज शपथविधीला होतो. मी आ. अजितदादांसोबतच असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. आमदार अजित पवारांना जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराने पाठींबा दिल्याचे चित्र आहे.

काँग्रेस-राकाँ पदाधिकार्‍यांची मात्र नाराजी

आ. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज सकाळी झालेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात चारही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या.

बहुमत सिध्द करूच – डॉ. संजीव पाटील

राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार स्थापन झाल्याचा आनंद आहे. निवडणूकीनंतर शिवसेनेने आम्हाला पर्याय खुले असल्याची भाषा वापरली. तरी देखिल आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखविली. पण शिवसेनेला आमच्यासोबत सत्ताच स्थापन करायची नव्हती. त्यामुळेच आज भाजपाचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला आहे. आमची आघाडी ही काळाची गरज असुन फडणवीस सरकार बहुमत निश्‍चीतपणे सिध्द करतील असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी व्यक्त केला.

अजित पवारांचा निर्णय चुकीचा – अ‍ॅड. रवींद्र पाटील

आ. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचाच आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुढे काय आदेश येतात ते पाहून निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांचा संपर्क होत नाही. परंतु लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.

घटनाविरोधी घडामोडी – अ‍ॅड. संदीप पाटील

राज्यात आज जी राजकीय उलथापालथ झाली ती नक्कीच धक्कादायक आहे. राज्याच्या राजकारणातील हा काळा दिवस आहे. भाजपाने ज्या पध्दतीने सत्ता स्थापन केली त्याबाबत जनक्षोभ वाढला आहे. विश्‍वासदर्शक ठरावात हे सरकार कोसळेल. राज्यपाल हे भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच वावरले आहे. आमचे सर्व आमदार एकसंघ असुन आज झालेली घडामोड ही घटनाविरोधी असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सांगितले.

सत्ता असो वा नसो आंदोलन हीच भूमिका – गुलाबराव वाघ

राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. बहुमतासाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे. शिवसेना सत्तेत असो वा नसो शेतकर्‍यांसाठी आंदोलन हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे याच्याशी काही देणे घेणे नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

बहुमतात हे सरकार नापास होईल – आ. शिरीष चौधरी

राज्यपालांनी न्यायबुध्दी न वापरता केलेली ही कृती घटनाविरोधी आहे. राज्यपालांनी पाठींब्याबाबत कुठलीही खात्री करून न घेता परस्पर शपथ देऊन घटनाबाह्य काम केले. अजित पवारांनी केलेले बंड हे अयोग्यच आहे. खुद्द शरद पवारांनी त्याचा निषेध केलाय. बहुमतावेळी आम्ही विरोधात मतदान करू. त्यावेळी हे सरकार नक्कीच नापास होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.