नागपूर : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘क्लीन चिट’ दिली आहे. टेंडर प्रक्रिया, खर्च मंजुरी इत्यादीसंदर्भातील बाबी तपासण्याची जबाबदारी जल संसाधन विभाग सचिव व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांची आहे. त्यामुळे पवार यांना या प्रकल्पांतील कुठल्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक (नागपूर) रश्मी नांदेडकर यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यापूर्वी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र देत पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अॅन्ड इन्स्ट्रक्शनमधील नियम १० अनुसार संबंधित मंत्री त्यांच्या विभागातील सर्व बाबींसाठी जबाबदार असतात. पवार हे जल संसाधन मंत्री असताना विदर्भ व कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचे चौकशीत आढळले आहे. मोबिलायझेशन अॅडव्हान्स व अन्य काही वादग्रस्त मंजुरीच्या नोटशीटस्वर पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती त्यावेळेच्या प्रतिज्ञापत्रात दिली होती.