मुंबई: राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. आघाडीचे सरकार २०१४ मध्ये जाण्यास अजित पवारांवरील हे आरोप कारणीभूत होते. त्यांच्यावर वारंवार हा आरोप होत होता. दरम्यान अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. एसीबीकडून त्यांना पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आले आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार पूर्णपणे निर्दोष असल्याचे प्रतिज्ञापत्रात एसीबीने नमूद आहे. एसीबीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मात्र उच्च न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचीट दिलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनीच कामात कसूर केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अधिकाऱ्यांचीच चौकशी होणार आहे. ४५ प्रकल्पांची २६५४ निविदांची तपासणी एसीबीने केली आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे अयोग्य असल्याचेही एसीबीने म्हटले आहे.
भाजपने अजित पवारांना सिंचन घोटाळ्यावरून सातत्याने लक्ष केले होते. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले होते. न्यायालयात गाडीभर पुरावे दिल्याचा दावा भाजपकडून वारंवार केला जायचा. मात्र यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावरुन देखील फडणवीस यांच्यावर आरोप झाले. सिंचन घोटाळ्यातील आरोपीशी हातमिळवणी केल्यावरून भाजपवर टीका झाली होती.