मुंबई: शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल अशी चर्चा सुरु असतानाच अचानक आज राज्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडत अजित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील,’ असा घणाघात केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार येणार वाटत असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि राजभवनात तातडीनं शपथविधीही झाला. या घडामोडींमुळं शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली. ‘कालपर्यंत अजित पवार आमच्यासोबत बैठकांमध्ये होते. पण चर्चेच्या वेळी ते कोणाच्याही नजरेला नजर मिळवत नव्हते. तेव्हाच त्यांच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे असा संशय आला होता. पण ते असं काही करतील असं वाटलं नव्हतं,’ असं राऊत म्हणाले.
‘ईडीच्या प्रकरणानंतर शरद पवारांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यावेळी अजित पवारांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हाच त्यांच्याबद्दल संशय वाढला होता. त्यांनी या वयात शरद पवारांना दगा दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही,’ असं ते म्हणाले.