मुंबई: राज्य सहकारी बँकांच्या २५ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा करण्याचे आदेश दिले आहे.
आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे, आता या प्रकरणी कोर्टाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार हे निश्चित. एकीकडे राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे, दुसरीकडे पी चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आणि सीबीआय कोर्टात हजर केले. त्यापाठोपाठ आता अजित पवारांच्या अडचणीही वाढण्याची चिन्हे आहेत.